हुनगुंदचे आमदार विजयानंद काशप्पनवर यांनी भाजप आणि जनार्दन रेड्डी यांच्यावर सडकून टीका केली आहे.

इळकल येथे प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी राज्यातील बॅनर वाद आणि आंध्र प्रदेशच्या धर्तीवर सुरू असलेल्या राजकारणावर तीव्र संताप व्यक्त केला. जनार्दन रेड्डी यांनी राजकारणात प्रवेश केल्यापासून राज्यात भ्रष्टाचाराचे पर्व सुरू झाले, असा आरोप त्यांनी केला आहे.
भाजपने कर्नाटकच्या शांत राजकारणात भ्रष्टाचाराचे विष कालवल्याचे त्यांनी म्हटले. जनार्दन रेड्डी जेव्हापासून आपले मूळ काम सोडून राजकारणात आले, तेव्हापासून पैशांचे आमिष आणि भ्रष्टाचाराला उधाण आले. २००४ मध्ये भाजपला सर्वाधिक जागा मिळाल्या, त्याला हे ‘गाली’ जनार्दन रेड्डीच कारणीभूत होते, असे गंभीर आरोप त्यांनी केले.
जनार्दन रेड्डी आणि श्रीरामुलू यांच्या कुटुंबाने राज्यात गुंडगिरीची संस्कृती आणली असल्याची टीका काशप्पनवर यांनी केली. उत्तर कर्नाटकातील माती खाणकामाच्या माध्यमातून लुटली गेली असून पैशांच्या जोरावर मतदारांना आकर्षित केले जात आहे. बंदूक घेऊन काम करण्याची आंध्रची पद्धत येथे आणली गेली असून ओबळापूरम खाणकामाच्या वेळी मंदिर पाडल्याचे पाप त्यांना आता नडत आहे. शांत असलेल्या राज्यात अशांतता पेरणाऱ्यांना आता आपल्या कर्माची फळे भोगावी लागत आहेत, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.


Recent Comments