राज्याच्या मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांचे पुत्र आणि काँग्रेसचे युवा नेते मृणाल हेब्बाळकर यांच्या कार चालकावर अज्ञात हल्लेखोरांनी चाकूने हल्ला केल्याची खळबळजनक घटना बेळगाव शहरात घडली आहे. या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.


बेळगुंदी येथील रहिवासी असलेले ३२ वर्षीय बसवंत कडोल्कर यांच्यावर हा हल्ला झाला आहे. दुचाकीवरून आलेल्या दोघांनी बसवंत यांच्यावर चाकूने चार ते पाच वार केले आणि तिथून पळ काढला. या प्राणघातक हल्ल्यात बसवंत गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.
प्राथमिक तपासात हा हल्ला पैशांच्या व्यवहारातून झाला असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे, हल्ला करणारे इसम जखमी बसवंत यांच्या परिचयाचेच असल्याची माहिती समोर येत आहे. ही घटना बेळगाव शहरातील क्लब रोड परिसरात घडली असून घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
गंभीर जखमी झालेल्या बसवंत यांना तातडीने बेळगावमधील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन मृणाल हेब्बाळकर यांनी स्वतः रुग्णालयात जाऊन बसवंत यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.
या प्रकरणी बेळगावच्या कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पोलिसांनी हल्लेखोरांचा शोध घेण्यासाठी पथके रवाना केली असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत.


Recent Comments