Belagavi

महाराष्ट्र एकीकरण युवा समितीकडून भव्य सामान्य ज्ञान स्पर्धा

Share

महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने बेळगावमध्ये भव्य सामान्य ज्ञान स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाला विद्यार्थ्यांकडून मोठा प्रतिसाद मिळाला असून सीमाभागातील शैक्षणिक क्षेत्रात या स्पर्धेची विशेष चर्चा रंगली आहे.

या स्पर्धेचे उद्घाटन प्रकाश मरगाळे, मालोजी अष्टेकर, रमेश पावले, आप्पासाहेब गुरव यांसह इतर मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. ही स्पर्धा एकूण चार विभागांत घेण्यात आली असून,६० गुणांच्या या परीक्षेत प्रामुख्याने शिवचरित्र आणि सामान्य ज्ञानाशी संबंधित प्रश्नांचा समावेश करण्यात आला होता.

महाराष्ट्र एकीकरण युवा समिती गेल्या पाच वर्षांपासून शालेय विद्यार्थ्यांसाठी सातत्याने या स्पर्धेचे आयोजन करत आहे. “या वर्षीही स्पर्धेला अतिशय चांगला प्रतिसाद मिळाला असून, भविष्यातील स्पर्धा परीक्षांना सामोरे जाण्यासाठी विद्यार्थ्यांना यामुळे मोठी मदत होणार आहे. समितीच्या वतीने दरवर्षी असे विविध विधायक उपक्रम राबवले जातात,” अशी प्रतिक्रिया समितीचे अध्यक्ष अंकुश केसरकर यांनी व्यक्त केली.

स्पर्धेच्या नियोजनाबाबत अधिक माहिती देताना समितीचे सहकार्यदर्शी श्रीकांत कदम यांनी माहिती दिली. “चार वेगवेगळ्या गटांत ही स्पर्धा पार पडली असून यामध्ये सुमारे २५०० विद्यार्थी सहभागी झाले आहेत. शिवचरित्राची माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्यासोबतच त्यांच्यातील कौशल्य गुणांचा विकास करणे हा यामागचा मुख्य उद्देश आहे,” असे त्यांनी म्हटले.

या भव्य स्पर्धेत बेळगाव शहर, बेळगाव ग्रामीण, खानापूर आणि निपाणी भागातील विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपला सहभाग नोंदवला.

Tags: