विजापूर पोलिसांनी घरफोडी करणाऱ्या दोन सराईत चोरट्यांच्या मुसक्या आवळून त्यांची रवानगी कारागृहात केली आहे. गेल्या सप्टेंबर महिन्यात कोल्हार तालुक्यातील मसुती गावात झालेल्या घरफोडीच्या गुन्ह्यात या दोघांना अटक करण्यात आली आहे.

अब्दुल्ला कलादगी (३०) आणि हिरा लोकापूर (२९) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेल्या २ मोटारसायकल आणि चोरी केलेले ४,५०,००० रुपये किमतीचे ४० ग्रॅम सोन्याचे दागिने पोलिसांनी जप्त केले आहेत,.
या प्रकरणाची पार्श्वभूमी अशी की, १९ सप्टेंबर रोजी मसुती गावातील दानम्मा यांच्या घराचे कुलूप तोडून आरोपींनी ४० ग्रॅम सोन्याचे दागिने लंपास केले होते. या संदर्भात कुडगी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणाचा सखोल तपास करून पोलिसांनी दोन्ही आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत, अशी माहिती विजापूरचे पोलीस अधीक्षक लक्ष्मण निंबरगी यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.


Recent Comments