Bailahongala

बैलहोंगलमध्ये उसाचा ट्रॅक्टर शिरला थेट हॉटेलमध्ये!

Share

बेळगाव जिल्ह्यातील बैलहोंगल शहरातील साई मंदिराजवळ ऊस भरलेला एक ट्रॅक्टर चालकाचा ताबा सुटल्याने थेट फास्ट फूड सेंटरमध्ये घुसला. ट्रॅक्टरमध्ये क्षमतेपेक्षा जास्त ऊस भरल्याने वळण घेताना वजन पेलवू न शकल्यामुळे हा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे.

या अपघाताच्या धडकेमुळे फास्ट फूड सेंटरमधील फर्निचर आणि इतर महागड्या वस्तूंचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. ट्रॅक्टर दुकानात शिरत असल्याचे पाहताच तिथे उपस्थित असलेले ग्राहक आणि कर्मचारी बाजूला पळाल्याने मोठी जीवितहानी टळली. या घटनेमुळे दुकान मालकाचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून बैलहोंगल पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे.

शहरातील रस्त्यांवरून होणाऱ्या धोकादायक आणि ओव्हरलोड ऊस वाहतुकीवर कडक निर्बंध घालावेत, अशी मागणी यावेळी परिसरातील नागरिकांनी केली आहे. ट्रॅक्टर चालक आणि मालकावर योग्य कारवाई करण्याची मागणी प्रशासनाकडे करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

Tags: