Savadatti

शाकंभरी पौर्णिमेनिमित्त लाखो भाविकांच्या गर्दीने फुलला यल्लम्मा डोंगर

Share

कर्नाटक आणि महाराष्ट्रासह देशभरातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या श्री क्षेत्र यल्लम्मा डोंगरावर शाकंभरी पौर्णिमेनिमित्त आयोजित यात्रेला ‘उदे गं आई,उदे….’ च्या गजरात लाखो भाविकांनी हजेरी लावली.


गुरुवारपासून सुरू झालेल्या या ऐतिहासिक यात्रेचा शनिवारी शाकंभरी पौर्णिमेनिमित्त मुख्य दिवस असून कडाक्याच्या थंडीची तमा न बाळगता लाखो भाविक डोंगरावर दाखल झाले आहेत. चौंडके वाजवत, कडूनिंब धारण करून देवीला दीड नमस्कार घालून नवस फेडणारे भाविक आणि भंडाऱ्याची मुक्त उधळण करत ‘उदो उदो’ असा जयघोष करणाऱ्या भक्तांच्या गर्दीने संपूर्ण यल्लम्मा डोंगर न्हाऊन निघाला आहे. जोगणभावीसह डोंगर माथ्यावर सध्या लाखो भाविकांचे वास्तव्य असून डोंगरावर ठिकठिकाणी भाविकांनी तंबू ठोकण्यात आले आहेत. आज शाकंभरी पौर्णिमेच्या शुभमुहूर्तावर बेळगाव जिल्ह्यातील अनेक गावांतील भाविकांनी एकत्र येऊन सामूहिक पडली भरण्याचा विधी पारंपरिक श्रद्धेने पार पाडला.

मुख्य सोहळा आज असला तरी गेल्या चार दिवसांपासूनच भाविकांनी दर्शनासाठी अलोट गर्दी केली असून जोगणभावीत पवित्र स्नान आटोपून भाविक अनवाणी पायाने डोंगर चढत देवीच्या दर्शनासाठी रांगा लावत आहेत.

मध्यरात्रीपासूनच दर्शनासाठी लागलेल्या रांगांमुळे भाविकांना सुमारे चार ते पाच तास ताटकळावे लागत आहे, मात्र भंडाऱ्याच्या उधळणीने मंदिर परिसर पूर्णपणे पिवळाधमक झाला असून भक्तीचा उत्साह शिगेला पोहोचला आहे. यात्रेनिमित्त वाढलेली गर्दी पाहता पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला असून खासगी वाहने, ट्रॅक्टर आणि परिवहन मंडळाच्या बसेसच्या रांगांमुळे सौंदत्ती मार्गावर वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. अलोट जनसमुदायासमोर डोंगरावरील अनेक मूलभूत सुविधाही अपुऱ्या पडत असल्याचे चित्र असून वाहतुकीची समस्या सोडवताना पोलीस प्रशासनाची मोठी दमछाक होत आहे.

Tags: