Belagavi

बालवीर विद्यानिकेतनच्या नूतन वास्तूचे उद्घाटन

Share

बेळगुंदी येथील बालवीर विद्यानिकेतन शाळेच्या बाराव्या स्नेहसंमेलनाचे औचित्य साधून शाळेच्या नूतन इमारतीचा उद्घाटन सोहळा योगतज्ञ अपर्णा गोजगेकर यांच्या हस्ते आणि बालवीर सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष प्रेमानंद बाळू गुरव यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात पार पडला.

महाराष्ट्र शासनाकडून मिळालेल्या दहा लाखांच्या निधीतून तयार झालेल्या वर्गखोलीचे उद्घाटन शिवसेना नेते मंगेश चिवटे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलताना मंगेश चिवटे यांनी शाळेच्या प्रगतीचे कौतुक करत बेळगावमधील मराठी माणसाच्या मागे खंबीरपणे उभे राहण्याची ग्वाही दिली.

या नूतन वास्तूमध्ये काटवा परिवाराने दिलेल्या नऊ लाखांच्या निधीतून ‘एच.डी. काटवा’ वर्गखोलीचे उद्घाटन दीपक काटवा आणि विलास काटवा यांच्या हस्ते झाले. यासोबतच अपर्णा गोजगेकर यांच्या हस्ते ‘सुरेखा गोजगेकर’ वर्गखोलीचे, तर आकाश शंकर चौगुले यांनी उभारलेल्या ‘उमा शंकर’ वाचनालय व अभ्यासिकेचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले.

ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबातील मुलांना दर्जेदार शिक्षण देणारी प्रयोगशील शाळा म्हणून बालवीर विद्यानिकेतनने अल्पावधीत नाव कमावले असून, या पवित्र कार्यात प्रेमानंद गुरव, शंकर चौगुले, डी.डी. बेळगावकर यांच्यासह अनेक दात्यांनी लाखांची मदत देऊन खारीचा वाटा उचलला आहे. स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी ‘जाणता राजा’, ‘सिंधुताई सपकाळ’ आणि ‘लाभले आम्हास भाग्य’ अशा विविध विषयांवरील नृत्ये सादर करून उपस्थितांची वाहवा मिळवली.

कार्यक्रमाला बालवीर परिवार, पालक आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

Tags: