Athani

डीसीसी बँक युनियन अध्यक्षाला सवदी पिता-पुत्राकडून मारहाण झाल्याचा आरोप

Share

माजी उपमुख्यमंत्री आणि आमदार लक्ष्मण सवदी, त्यांचे पुत्र चिदानंद सवदी व समर्थकांनी डीसीसी बँक कर्मचारी युनियनच्या अध्यक्षाला मारहाण केल्याचा खळबळजनक आरोप झाला आहे. मात्र, लक्ष्मण सवदी यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावत यात आपले नाव ओढणे चुकीचे असल्याचे म्हटले आहे.

अथणी येथील लक्ष्मण सवदी यांच्या निवासस्थानी आज सकाळी युनियनचे अध्यक्ष एन. के. करेण्णवर यांच्यावर हल्ला झाल्याचा आरोप आहे. डीसीसी बँक निवडणुकीत जारकीहोळी यांच्यासाठी काम केल्याच्या रागातून सवदी, त्यांचे पुत्र आणि समर्थकांनी आपल्याला मारहाण केली, असा दावा करेण्णवर यांनी केला आहे. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, “माझ्या मृत्यूला सवदीच जबाबदार असतील” असा व्हिडिओ त्यांनी प्रसिद्ध केला आहे.

या प्रकरणी स्पष्टीकरण देताना आमदार लक्ष्मण सवदी यांनी हा आरोप राजकीय प्रेरित असल्याचे सांगितले. युनियनमधील अंतर्गत आर्थिक वादावर चर्चेसाठी करेण्णवर आले असताना बाहेर कार्यकर्त्यांसोबत त्यांची बाचाबाची झाली. करेण्णवर यांनी कार्यकर्त्याला जातीवाचक शिवीगाळ केल्याने त्यांच्यात धक्काबुक्की झाली असून यात आपला किंवा पुत्राचा कोणताही सहभाग नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.

Tags: