Belagavi

उड्डाणपूल, यल्लम्मा डोंगर विकास आणि शेतकऱ्यांसंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांची महत्वपूर्ण बैठक

Share

बेळगाव शहरात प्रस्तावित उड्डाणपुलाच्या कामाला गती देण्यासाठी आणि सार्वजनिक मते जाणून घेण्यासाठी एका आठवड्यात जाहीर सभा बोलावली जाईल, अशी माहिती जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिली.

आज बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयात विभागस्तरीय अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. बैठकीनंतर आयोजिण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले की, पहिल्या टप्प्यात राष्ट्रीय महामार्ग, सम्राट अशोक रोड, मध्यवर्ती बसस्थानक, आरटीओ सर्कल ते चन्नम्मा सर्कलपर्यंत काम होणार आहे. यासंदर्भात सार्वजनिक सभेतील चर्चेनंतर सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली टेंडर प्रक्रिया राबवली जाईल. तसेच सवदत्ती यल्लम्मा डोंगराच्या विकासासाठी २१५ कोटी रुपये मंजूर झाले असून १५ ते २० फेब्रुवारी दरम्यान या कामांचा शुभारंभ होणार आहे.

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आतापर्यंत ११६ कोटी रुपयांची भरपाई देण्यात आली आहे. तसेच पावसामुळे पूर्ण घर कोसळलेल्या प्रसाद माळी यांना घर बांधण्यासाठी ५ लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. महानगरपालिकेने त्यांना पायाभरणीचे काम पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या असून पुढील हप्त्याचे अनुदान लवकरच दिले जाणार आहे.

सदर बैठक विविध विभागाच्या अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पार पडली.

Tags: