ऐतिहासिक नंदगड गावातील श्री चन्नवीरेश्वर यात्रेनिमित्त शिदोरी मिरवणूक अत्यंत उत्साहात आणि भक्तीमय वातावरणात पार पडली. शेकडो महिलांनी पारंपारिक शिदोरी आपल्या डोक्यावर घेऊन या मिरवणुकीत सहभाग नोंदवला.


नंदगड येथील बसवेश्वर मंदिरापासून ते श्री विरक्त मठापर्यंत ही विशेष मिरवणूक काढण्यात आली होती. या मिरवणुकीत महिलांनी पांढऱ्या कपड्याने सजवलेल्या टोपल्यांमध्ये मुगाच्या डाळीची भाजी, कडबू, चपाती, भाकरी आणि विविध प्रकारच्या चटण्यांची शिदोरी डोक्यावर धारण केली होती. ढोल-ताशांच्या आणि पारंपारिक वाद्यांच्या गजरात ही मिरवणूक गावातील प्रमुख मार्गांवरून काढण्यात आली.

मिरवणूक विरक्त मठात पोहोचल्यानंतर श्री चन्नवीरेश्वर महाराज आणि इतर मठाधिपतींच्या मार्गदर्शनाखाली विशेष पूजा करण्यात आली. पूजेनंतर सर्व भक्तांनी एकत्रितपणे महाप्रसादाचा लाभ घेतला. या धार्मिक सोहळ्यातून सामाजिक ऐक्य आणि परंपरेचे सुंदर दर्शन घडले.

या सोहळ्याला यात्रा समितीचे पदाधिकारी, गावातील ज्येष्ठ नागरिक, तरुण मंडळी आणि मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. श्री चन्नवीरेश्वराच्या जयघोषाने संपूर्ण नंदगड परिसर दुमदुमून गेला होता.


Recent Comments