Savadatti

सवदत्तीत शॉर्ट सर्किटमुळे घराला भीषण आग

Share

बेळगाव जिल्ह्यातील सवदत्ती शहरात शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या भीषण आगीत घरातील रोकड, सोन्याचे दागिने आणि लाखो रुपयांचे साहित्य जळून खाक झाले आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून पीडित कुटुंबाचे मोठे नुकसान झाले आहे.

सवदत्ती शहरातील जंबळेंनवर गल्लीतील रहिवासी फकीरप्पा बेणकट्टी यांच्या घरी ही दुर्घटना घडली आहे. बुधवारी सवदत्तीचा आठवडी बाजार असल्याने कुटुंबातील सदस्य व्यापारासाठी बाजारात गेले होते. घरात कोणीही नसताना अचानक शॉर्ट सर्किट होऊन ही आग लागली.

या आगीत घरातील कपडे, अन्नधान्य यासह कपाटात ठेवलेले सोन्याचे दागिने आणि सुमारे २.५ लाख रुपयांची रोकड भस्मसात झाली आहे. फकीरप्पा बेणकट्टी हे रस्त्यावर फळ विक्री करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. संपूर्ण आयुष्याची पुंजी या आगीत नष्ट झाल्याने हे गरीब कुटुंब उघड्यावर आले असून त्यांनी मोठी हळहळ व्यक्त केली आहे. कुटुंबाच्या माहितीनुसार, एकूण १० लाख ८० हजार रुपयांची मालमत्ता या आगीत जळाली आहे.

घटनेची माहिती मिळताच सवदत्ती अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आग विझवण्यात यश मिळवले. याप्रकरणी सवदत्ती पोलीस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.

Tags: