Athani

अथणी आगाराच्या बसमध्ये तिकीट घोटाळा; पुरुषांनाही ‘फ्री’ प्रवासाची सवलत?

Share

परिवहन महामंडळाच्या अथणी आगारातील अथणी ते हारुगेरी मार्गावर धावणाऱ्या बसमध्ये वाहकाने प्रवाशांकडून पैसे घेऊनही त्यांना तिकीट न देता फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

प्रवासादरम्यान कंडक्टरने पुरुष प्रवाशांकडून तिकिटाचे पूर्ण पैसे वसूल केले, मात्र त्यांना तिकीट दिले नाही. हा प्रकार प्रवाशांच्या आणि काही स्थानिक नागरिकांच्या लक्षात येताच त्यांनी बस थांबवून कंडक्टरला जाब विचारला. “पुरुषांनाही आता बस फ्री झाली आहे का?” अशा शब्दांत स्थानिकांनी कंडक्टरची कानउघाडणी केली. सरकारी बस सेवेतील कर्मचाऱ्यांकडूनच अशा प्रकारे पैशांची अफरातफर होत असल्याने संताप व्यक्त होत आहे.

जनतेच्या पैशांचा गैरवापर आणि प्रवाशांच्या विश्वासाला तडा देणाऱ्या या घटनेमुळे परिवहन मंडळाच्या प्रतिमेला धक्का पोहोचला आहे. या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून संबंधित दोषी कर्मचाऱ्यावर कठोर प्रशासकीय कारवाई करावी, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.

या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून, यामुळे अथणी परिसरात केएसआरटीसी प्रशासनाविरुद्ध रोष निर्माण झाला आहे.

Tags: