तक्रार देण्यासाठी आलेल्या विवाहितेशी अनैतिक संबंध प्रस्थापित करून तिच्या पती आणि मुलाला छळल्याचा खळबळजनक आरोप एका पोलीस अधिकाऱ्यावर करण्यात आला आहे. मुलासमोरच या दोघांचे प्रेमसंबंध सुरू असून त्यांचे फोटो व्हायरल झाल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे.

विजापूर जिल्ह्यातील आलमेल येथील भीमाशंकर होळकर यांची पत्नी अनुराधा ही पोलीस अधिकाऱ्याच्या जाळ्यात फसल्याचे समोर आले आहे. भीमाशंकर आणि अनुराधा यांचे १० वर्षांपूर्वी लग्न झाले असून त्यांना एक मुलगा आहे. पाच वर्षांपूर्वी या दाम्पत्यात घरगुती वाद झाला होता. त्यावेळी अनुराधाने आलमेल पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. या प्रकरणाच्या चौकशीदरम्यान तत्कालीन एएसआय मनोहर कांचगार यांच्याशी तिची ओळख झाली आणि त्याचे रूपांतर पुढे प्रेमसंबंधात झाले. तेव्हापासून ही महिला आणि पोलीस अधिकारी मिळून पतीच्या कुटुंबाला त्रास देत असल्याचा आरोप होत आहे.
पत्नीचे पोलीस अधिकाऱ्याशी असलेले संबंध उघड झाल्यानंतर आपण मुलासह बंगळुरूला स्थलांतर केले, तरीही तिथे येऊन या दोघांनी आपल्याला त्रास दिल्याचे भीमाशंकर होळकर यांनी म्हटले आहे. या पोलीस अधिकाऱ्याने आपल्या लहान मुलाला अमानुष मारहाण करून स्वतःला ‘वडील’ म्हणण्यास भाग पाडल्याची धक्कादायक माहिती भीमाशंकर यांनी दिली. पत्नी आणि पोलीस अधिकाऱ्याच्या या त्रासामुळे आपले संपूर्ण कुटुंब संकटात सापडले असून आपल्याला न्याय मिळावा, अशी आर्त हाक त्यांनी दिली आहे.
याप्रकरणी भीमाशंकर यांनी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे तक्रार केली असून, संबंधित पोलीस अधिकाऱ्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.


Recent Comments