विजापूर शहरातील दिवटगेरी गल्ली परिसरात दुध आणण्यासाठी गेलेल्या महिलेचे कान चाकूने कापून तिचे दागिने लुटल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी गोलघुमट पोलिसांनी अत्यंत वेगाने तपास चक्रे फिरवत अवघ्या चार तासांत दोन्ही आरोपींना अटक केली आहे.


विजापूर शहरात अंमली पदार्थांच्या आहारी गेलेल्या तरुणांकडून गुन्हेगारी वाढू लागली आहे. काल संध्याकाळी ७ वाजेच्या सुमारास कलावती गायकवाड (४५) या महिला दुध आणण्यासाठी दुकानात जात असताना दोघा तरुणांनी त्यांचा पाठलाग केला. निर्मनुष्य ठिकाणी संधी साधून या नराधमांनी चाकूने महिलेचे कान कापले आणि कानातले तसेच मंगळसूत्र हिसकावून पळ काढला. विशेष म्हणजे, हल्ला करताना आपण तुमच्या मुलाचे मित्र आहोत, असे सांगून त्यांनी संभ्रम निर्माण केला होता.
या भयंकर हल्ल्यात कलावती गायकवाड गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्या कानाला टाके घालण्यात आले आहेत. त्यांच्यावर सध्या खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. परिसरात भीतीचे वातावरण असतानाच पोलिसांनी आसिफ जमादार आणि रिहान मणियार या दोघा संशयितांना ताब्यात घेतले आहे.
महिलेकडून १० ग्रॅमचे सोन्याचे मंगळसूत्र आणि कानातले दागिने लुटल्याची तक्रार दाखल झाली होती. त्यानंतर गोळगुमट पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे तपास करून आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. भरवस्तीत घडलेल्या या अमानवीय घटनेमुळे नागरिकांमधून संताप व्यक्त केला जात असून, आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत असल्याचे स्थानिक रहिवाशांनी म्हटले आहे.


Recent Comments