बेळगाव आणि चिक्कोडी विभागात गेल्या नऊ महिन्यांत अबकारी विभागाने अवैध दारू विक्रीविरोधात मोठी मोहीम राबवली आहे. या कारवाईत १२९४ गुन्हे दाखल करून २ कोटी २८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

अबकारी सहआयुक्त फकीरप्पा चलवादी यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. एप्रिल ते डिसेंबर या कालावधीत विभागाने ही धडक कारवाई केली असून यात ग्रामीण भागातील अवैध विक्रीच्या ७८३ प्रकरणांचा समावेश आहे. हातभट्टी आणि ढाब्यांवरील बेकायदा पार्ट्या रोखण्यासाठी बीट पोलिसांची विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत. निवडणूक काळातील हेल्पलाईन पुन्हा सुरू करून नागरिकांच्या तक्रारींची दखल घेतली जाईल, असे फकीरप्पा चलवादी यांनी सांगितले.
रायबाग येथील एका बारमध्ये ५ वर्षांच्या मुलाला दारू पाजल्याची धक्कादायक घटना समोर आली होती. याप्रकरणी संबंधित बारवर गुन्हा दाखल करण्यात आला असून सध्या सखोल तपास सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
अबकारी विभागात ३० टक्के कर्मचाऱ्यांची कमतरता असली तरी उपलब्ध मनुष्यबळाद्वारे नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर कडक बंदोबस्त ठेवला जाणार आहे. मद्य विक्रेत्यांना विक्रीचे कोणतेही टार्गेट दिले नसून, मद्यपान करून वाहन चालवणे आणि नवीन वर्षाच्या नावाखाली होणारे अवैध प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत, असा इशारा फकीरप्पा चलवादी यांनी दिला आहे.
या पत्रकार परिषदेला अबकारी जिल्हाधिकारी जगदीश एन.के., निंगनगौडा पाटील, विजय हिरेमठ आणि इतर अधिकारी उपस्थित होते.


Recent Comments