बेंगळुरू येथे पार पडलेल्या ‘स्कूल गेम्स २०२५’ राज्यस्तरीय स्पीड स्केटिंग स्पर्धेत बेळगावच्या खेळाडूंनी देदीप्यमान कामगिरी केली आहे. या स्पर्धेत बेळगावच्या स्केटर्सनी आपली छाप पाडत एकूण १३ पदके पटकावून जिल्ह्याच्या लौकिकात भर घातली आहे.

या राज्यस्तरीय स्पर्धेत कर्नाटकभरातून ३०० हून अधिक निष्णात स्केटर्सनी सहभाग नोंदवला होता. अत्यंत चुरशीच्या झालेल्या या स्पर्धेत बेळगाव जिल्हा रोलर स्केटिंग असोसिएशनतर्फे निवड झालेल्या या खेळाडूंनी ३ सुवर्ण, ६ रौप्य आणि ४ कांस्य पदकांची कमाई केली. यामध्ये जान्हवी तेंडुलकर (२ सुवर्ण), आराध्या पी. (१ सुवर्ण, १ रौप्य), रश्मिता अंबिगा (२ रौप्य, १ कांस्य), शल्या तरळेकर (१ रौप्य, १ कांस्य), ऋत्विक दुबाशी (१ रौप्य), अवनीश कामन्नावर (१ रौप्य, १ कांस्य) आणि करुणा वाघेला (१ कांस्य) या खेळाडूंचा समावेश आहे.
या सर्व यशस्वी खेळाडूंना केएलई संस्था आणि गुड शेफर्ड स्केटिंग रिंकमध्ये सूर्यकांत हिंडलगेकर, विठ्ठल गंगाणे, योगेश कुलकर्णी, विश्वनाथ यळ्ळूरकर आणि सोहम हिंडलगेकर यांचे मार्गदर्शन लाभले आहे. या यशाबद्दल डॉ. प्रभाकर कोरे, माजी आमदार शाम घाटगे, राज घाटगे, उमेश कलघटगी यांसह मान्यवरांनी खेळाडूंचे अभिनंदन केले आहे.


Recent Comments