State

नव्या वर्षासाठी मुख्यमंत्र्यांकडून सुरक्षा व्यवस्थेचा आढावा

Share

नव्या वर्षाच्या स्वागतादरम्यान बेंगळुरू शहरात कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी पोलीस प्रशासनाला कडक पावले उचलण्याचे आदेश दिले आहेत.

आज शासकीय निवासस्थानी आयोजित बैठकीत त्यांनी सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला. यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की, नव्या वर्षाच्या स्वागतासाठी बेंगळुरूमध्ये कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. यानुसार शहरात २० हजार स्थानिक आणि १२०० अतिरिक्त पोलिसांचा ताफा तैनात असेल, तर महिलांच्या सुरक्षेसाठी ‘चन्नम्मा’ पथके आणि १६४ मदत कक्ष सज्ज राहतील. अपघातांना आळा घालण्यासाठी ५० फ्लायओव्हरवर दुचाकींना बंदी घालण्यात आली असून ३५०० तळीरामांवर आधीच गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. एम.जी. रोडसह गर्दीच्या ठिकाणी सीसीटीव्हीद्वारे लक्ष ठेवले जाणार असून, ड्रग्ज आणि स्टंटबाजी करणाऱ्यांविरुद्ध ‘झिरो टॉलरन्स’ धोरण राबवण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. नागरिकांच्या सोयीसाठी मध्यरात्रीनंतर बीएमटीसी बसच्या जादा फेऱ्या, ७८ वॉच टॉवर्स आणि ५५ रुग्णवाहिकांची व्यवस्था करण्यात आली आहे.

या बैठकीला गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर, पोलीस महासंचालक डॉ. एम. ए. सलीम आणि इतर वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते.

Tags: