विजापूर शहरातील गौरीशंकर नगर येथे हुंड्यासाठी एका महिला डॉक्टरचा छळ करून तिची हत्या केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. सविता शिरस्याळ (३०) असे मृत महिलेचे नाव असून, याप्रकरणी पती राजशेखर शिरस्याळ, दीर आणि सासूवर हत्येचा आरोप करण्यात आला आहे.


विवाहितेच्या कुटुंबीयांनी दिलेल्या माहितीनुसार, सविता यांचा विवाह नऊ वर्षांपूर्वी बी.ए.एम.एस. डॉक्टर असलेल्या राजशेखर यांच्याशी झाला होता. लग्नाच्या वेळी १० तोळे सोने हुंडा म्हणून देण्यात आले होते. मात्र, त्यानंतरही राजशेखर हा सतत अधिक सोने आणि पैशांची मागणी करत सविता यांचा छळ करत होता. याच छळातून सविता यांची हत्या करण्यात आली असावी, असा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला आहे.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदन केले. त्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आला, यावेळी नातेवाईकांनी एकच आक्रोश केला. विशेष म्हणजे, या घटनेनंतर डॉक्टर राजशेखर आणि त्याचे कुटुंबीय घर आणि रुग्णालयातून गायब झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

याप्रकरणी विजापूर शहरातील महिला पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.सविस्तर चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी मृत सविता यांच्या नातेवाईकांनी केली आहे.


Recent Comments