Dharwad

नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवर धारवाडमध्ये पोलिसांकडून ‘राऊडी परेड’

Share

नवीन वर्षाच्या स्वागतासाठी देशवासीय सज्ज होत आहेत. या पार्श्वभूमीवर शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी हुबळी-धारवाड पोलिसांनी धारवाडमध्ये रेकॉर्डवरील राऊडींची परेड घेऊन त्यांना कडक इशारा दिला.

धारवाडमधील तीन पोलीस ठाण्यांच्या कार्यक्षेत्रातील राऊडींना एकत्र बोलावून आज एसीपी प्रशांत सिद्धनगौडा यांच्या नेतृत्वाखाली ही ‘राऊडी परेड’ घेण्यात आली. धारवाड शहर पोलीस ठाणे, उपनगर पोलीस ठाणे आणि विद्यागिरी पोलीस ठाणे या सीमांमधील सराईत गुन्हेगारांना पोलीस ठाण्यात पाचारण करण्यात आले होते. यावेळी एसीपींनी सर्व राऊडींना कायद्याचे धडे देत, कोणत्याही समाजविघातक कृत्यात सहभाग आढळल्यास कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा सज्जड दम भरला.

नवीन वर्षाच्या सेलिब्रेशन दरम्यान शहरात शांतता राहील याची जबाबदारी संबंधितांवर सोपवत त्यांनी कडक सूचना दिल्या. जर परिसरात कोणतीही संशयास्पद हालचाल किंवा अनुचित घटना घडल्यास तात्काळ पोलिसांना कळवून सामाजिक जबाबदारी पार पाडावी, असे आवाहनही त्यांनी केले. नवीन वर्षात जुन्या गुन्हेगारी वृत्ती सोडून सर्वांनी आदर्श जीवन जगण्याचा प्रयत्न करावा, अशी समजही एसीपींनी यावेळी राऊडी परेड दरम्यान दिली.

कोणत्याही परिस्थितीत शहरात हुल्लडबाजी किंवा दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केल्यास पोलीस गय करणार नाहीत, असे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला शहराच्या सुरक्षेसाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार असून संशयास्पद हालचालींवर पोलिसांची विशेष नजर राहणार आहे.

Tags: