Belagavi

काकती महामार्गावर भीषण अपघात चार जण गंभीर जखमी

Share

काकती महामार्गावर उभ्या असलेल्या बोलेरो गाडीला मालवाहू ट्रकने पाठीमागून जोरदार धडक दिल्याने भीषण अपघात झाला. दोन्ही वाहने बेळगावच्या दिशेने जात असताना हा अपघात घडला. या घटनेत चार जण जखमी झाले असून त्यांना तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले आहे.

या अपघातामध्ये बिजय, मोमीन, बजरंगी आणि शशिमणी हे चार जण जखमी झाले आहेत. अपघातावेळी बोलेरो गाडी महामार्गावर उभी होती, अशातच पाठीमागून आलेल्या भरधाव ट्रकने या गाडीला धडक दिली, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे. जखमींपैकी एकाची प्रकृती अत्यंत चिंताजनक असून रुग्णालयात नेताना तो बेशुद्धावस्थेत होता.

अपघाताची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते अवधूत तुदवेकर, दर्शन होळबट्टे, संतोष दरेकर, पद्मप्रसाद हुली आणि राजू टक्केकर यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी जखमींना तातडीने उपचार मिळवून देण्यासाठी बेळगावच्या बिम्स रुग्णालयातील आपत्कालीन विभागात दाखल केले.

अपघाताची तीव्रता इतकी भीषण होती की दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. महामार्गावरील बर्डे ढाब्याजवळ रंगाचे काम सुरू असताना हा अपघात घडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

अवधूत तुदवेकर, दर्शन होळबट्टे, संतोष दरेकर, पद्मप्रसाद हुली आणि राजू टक्केकर या सामाजिक कार्यकर्त्यांच्या तत्परतेमुळे अपघातातील जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Tags: