बेळगाव जिल्ह्याचे विभाजन करून निर्माण होणाऱ्या नवीन चिक्कोडी जिल्ह्याला ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी दलित संघर्ष समिती (भीमवाद) संघटनेचे राज्य निमंत्रक संजीव कांबळे यांनी केली आहे.

चिक्कोडी येथील विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. कांबळे म्हणाले की, बेळगाव जिल्हा विभाजनाबाबत नुकत्याच झालेल्या अधिवेशनात चर्चा झाली असून चिक्कोडी आणि गोकाक स्वतंत्र जिल्हे करण्याची मागणी जोर धरत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी चिक्कोडी न्यायालयात वकिली केली असून, त्यांच्याच पक्षाकडून चिक्कोडीतून दत्ता कट्टी आणि चंपाबाई भोगले निवडून आले होते. या ऐतिहासिक आठवणी जतन करण्यासाठी नवीन जिल्ह्याला बाबासाहेबांचे नाव देणे गरजेचे आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री आणि मंत्र्यांना वारंवार निवेदने देण्यात आली असून, नामाकरण न झाल्यास उग्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा त्यांनी दिला. तसेच हुबळी येथील ‘ऑनर किलिंग’ घटनेचा निषेध करत जातीव्यवस्थेविरुद्ध कठोर कायदा करण्याची मागणीही त्यांनी केली.
यावेळी राज्य समिती सदस्य आनंद अरबळ्ळी, जिल्हा निमंत्रक परशुराम टोनपे, रेखा बंगारी, आरती कांबळे, राजू गौरवगोळ, सदाशिव कांबळे, ईरप्पा संतवोळ, निखिता गदाडे, प्रकाश कांबळे, रोहित नायक, कविता बेविनकट्टी, वीरप्पा कांबळे आणि अनिल कांबळे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.


Recent Comments