निपाणी तालुक्यातील गळतगा ग्रामपंचायत हद्दीत पाणी आणण्यासाठी गेलेला सुनील बाळासाहेब तळकर नामक २१ वर्षीय ऊसतोड मजूर विहिरीत पडून दगावल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

गळतगा जवळील भीमपूरवाडी येथील सुनील तळकर हा गेल्या दोन वर्षांपासून ऊसतोडणीचे काम करत होता. सकाळी ऊसतोड मजुरांच्या न्याहारीसाठी पाण्याची सोय करण्यासाठी तो शेतातील विहिरीवर पाणी आणायला गेला होता. मात्र, विहिरीतून पाणी काढत असताना अचानक त्याचा पाय घसरला आणि तो खोल पाण्यात पडला.
पाणी आणण्यासाठी गेलेला सुनील बराच वेळ परतला नसल्याने सहकाऱ्यांनी विहिरीकडे धाव घेतली. यावेळी विहिरीची संरक्षक भिंत खचल्याचे आणि सुनील पाण्यात पडल्याचे निदर्शनास आले. स्थानिक शेतकरी आणि मजुरांनी तातडीने या दुर्घटनेची माहिती सदलगा पोलीस ठाण्याला दिली.
घटनेची माहिती मिळताच सदलगा पोलीस उपनिरीक्षक शिवकुमार बिरादार यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन दलाच्या जवानांच्या मदतीने सुनीलचा मृतदेह विहिरीबाहेर काढण्यात आला. याप्रकरणी सदलगा पोलीस ठाण्यात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.


Recent Comments