Belagavi

अमली पदार्थ विक्रीप्रकरणी बेळगाव पोलिसांची कारवाई

Share

बेळगाव शहरात गुन्हेगारी कारवायांविरुद्ध पोलिसांनी कडक मोहीम उघडली असून, अमली पदार्थांची विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यासोबतच मटका अड्डा आणि वाहतूक नियम मोडणाऱ्यांविरुद्ध कठोर पावले उचलली आहेत.

बेळगावच्या कांग्राळी येथील महादेव मंदिराजवळ हेरॉईन विकणाऱ्या दोन आरोपींना सीसीबी पोलिसांनी अटक केली आहे. महादेव गजानन पाटील (२७) आणि विनायक सुब्बाराव चिन्नाळ्ळर अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्याकडून २१,४०० रुपये किमतीची १०.१५ ग्रॅम हेरॉईन पावडर, दोन मोबाईल फोन आणि रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. प्राथमिक माहितीनुसार, मुंबईतील एका महिलेकडून हे अमली पदार्थ आणले गेले होते. एपीएमसी पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

तसेच, खंजर गल्लीमध्ये मटका खेळवून घेणाऱ्या हायमन हसनसाब चिक्कोडी आणि रफीक हुसेनसाब मुल्ला या दोघांना मार्केट पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून रोख रक्कम आणि मटक्याच्या चिठ्ठ्या जप्त करण्यात आल्या असून, कर्नाटक पोलीस कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दुसरीकडे, रस्ते सुरक्षा समितीच्या सूचनेनुसार दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांविरुद्धही कारवाई तीव्र करण्यात आली आहे. २६ डिसेंबर रोजी एकाच दिवसात १५ तळीराम चालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले. पोलीस आयुक्त आणि उपायुक्तांनी या यशस्वी कारवायांबद्दल पोलीस पथकाचे कौतुक केले आहे.

Tags: