Delhi

नवी दिल्लीत आज काँग्रेस कार्यकारिणीची महत्त्वाची बैठक

Share

एआयसीसी अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या नेतृत्वाखाली आज दिल्लीतील इंदिरा भवन येथे काँग्रेस कार्यकारिणीची महत्त्वाची बैठक सुरू झाली आहे. या बैठकीला लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी, काँग्रेस संसदीय मंडळाच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासह देशभरातील वरिष्ठ नेते उपस्थित आहेत.

केंद्रातील भाजप सरकारने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा बदलण्याचा किंवा रद्द करण्याच्या घेतलेल्या निर्णयाविरोधात देशभर आंदोलन उभारण्याबाबत या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. तसेच आगामी विविध राज्यांतील विधानसभा निवडणुकांसाठी रणनीती आखणे, हा या बैठकीचा मुख्य उद्देश असल्याची चर्चा सुरु आहे.

कर्नाटकातील ‘मुख्यमंत्री बदल’ किंवा ‘सत्तावाटप’ संदर्भात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या वादावर या बैठकीत चर्चा होण्याची दाट शक्यता आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या आधीच दिल्लीला पोहोचले असून ते या बैठकीत सहभागी झाले आहेत. मात्र, उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांना या बैठकीचे निमंत्रण नसल्याने ते दिल्लीला गेलेले नाहीत.

“डी.के. शिवकुमार यांच्या अनुपस्थितीत हायकमांड सत्तावाटपासारख्या गंभीर विषयावर आजच अंतिम निर्णय घेण्याची शक्यता कमी आहे,” अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. मात्र, मल्लिकार्जुन खर्गे यांनी दिल्लीला जाण्यापूर्वी डी.के. शिवकुमार यांच्याशी प्रदीर्घ चर्चा केली असून, “सर्व गोंधळ मिटवू” असे आश्वासन दिले आहे. या बैठकीनंतर मुख्यमंत्री सिद्धरामय्या हायकमांडची स्वतंत्रपणे भेट घेणार असून, त्यानंतर मंत्रिमंडळ फेरबदल किंवा नेतृत्वाबाबत अधिक स्पष्टता समोर येण्याची शक्यता आहे.

Tags: