Belagavi

ज्ञानदीप एज्युकेशन ट्रस्टचा सुवर्ण महोत्सव थाटात संपन्न

Share

पालकांनी टीव्ही मालिकांमध्ये स्वतःला गुंफून न घेता मुलांशी संवाद साधावा. मुलांचे मित्र बनून त्यांच्या समस्या समजून घेतल्या पाहिजेत आणि त्यांना आयुष्यात यशस्वी नागरिक बनवण्यासाठी योग्य मार्गदर्शन केले पाहिजे, असे प्रतिपादन राज्यसभा सदस्य पद्मश्री ॲड. उज्ज्वल निकम यांनी केले.

बेळगाव येथील ज्ञानदीप एज्युकेशन ट्रस्टच्या सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमाचे आयोजन अत्यंत उत्साहात करण्यात आले होते. या सोहळ्याला मुख्य अतिथी म्हणून खासदार उज्ज्वल निकम उपस्थित होते. यावेळी त्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून महोत्सवाचा शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमाला दक्षिणचे आमदार अभय पाटील, राणी चन्नम्मा विद्यापीठाचे कुलगुरू सी.एम. त्यागराज आणि ट्रस्टचे अध्यक्ष चंद्रहास अन्वेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

ज्ञान हे विविध स्रोतांतून मिळवता येते, मात्र बुद्धिमत्ता ही स्वतःलाच विकसित करावी लागते, असे उज्ज्वल निकम यांनी यावेळी नमूद केले. पराभव हा गुन्हा नाही, परंतु प्रयत्न सोडून देणे हा मोठा गुन्हा आहे. व्यवसायातील प्रामाणिकपणा, शिस्त आणि निस्वार्थ सेवा माणसाला परिपूर्ण बनवते. पालकांनी मुलांच्या शिक्षणात रस घेऊन त्यांना योग्य वाटेवर नेण्यासाठी प्रयत्नशील राहावे, असे आवाहन त्यांनी केले.

तत्पूर्वी बोलताना आमदार अभय पाटील यांनी ज्ञानदीप एज्युकेशन ट्रस्टच्या ५० वर्षांच्या गौरवशाली प्रवासाचे कौतुक केले. या संस्थेने हजारो विद्यार्थ्यांना शिक्षण देऊन साक्षर केले असून, आज अनेक विद्यार्थी उच्च पदांवर कार्यरत आहेत, ही अभिमानाची गोष्ट आहे. ज्या शाळेत आपण शिकलो, त्या शाळेसाठी काहीतरी देणे हे माजी विद्यार्थ्यांचे कर्तव्य आहे, असे त्यांनी म्हटले.

या सोहळ्यात गुणवंत विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाला वसंत जोशी, नवीना शेट्टीगार, सुधाकर देसाई, इंद्रनील अन्वेकर, मोहन सुतार यांच्यासह मोठ्या संख्येने विद्यार्थी आणि पालक उपस्थित होते.

Tags: