शांती आणि नम्रतेचा दूत असलेल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्मोत्सव बेळगाव शहर आणि जिल्ह्यात अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला. कडाक्याच्या थंडीची पर्वा न करता ख्रिस्ती बांधवांनी मध्यरात्री आयोजित केलेल्या विशेष प्रार्थना सभांमध्ये मोठ्या संख्येने सहभाग नोंदवून सणाचा आनंद लुटला.


बेळगाव कॅम्प परिसरातील फातिमा कॅथेड्रलमध्ये बिशप डॅरेक फर्नांडिस यांच्या नेतृत्वाखाली विशेष प्रार्थना संपन्न झाली. जगाच्या इतिहासात अनेक मुले मोठी होऊन राजे झाली, मात्र एक राजा स्वतः बालक म्हणून जन्माला आला, हा इतिहास केवळ ख्रिस्ताचाच आहे, असे त्यांनी म्हटले. अंधार दूर करण्यासाठी प्रकाश म्हणून आलेल्या ख्रिस्ताला आपण सर्वांनी हृदयात स्थान देऊन मानवतेची सेवा करावी, असे आवाहन त्यांनी केले.

यानंतर बिशप हाऊसमध्ये आयोजित विशेष कार्यक्रमात मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, केएलई संस्थेचे कार्याध्यक्ष प्रभाकर कोरे, आमदार आसिफ सेठ यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थित राहून ख्रिसमस केक कापला आणि शुभेच्छांची देवाणघेवाण केली. शहरातील सेंट अँथनी चर्च, मेथोडिस्ट चर्चसह विविध चर्चमध्ये भाविकांनी एकमेकांना मिठाई वाटून आणि शुभेच्छा देऊन ख्रिसमस उत्साहात साजरा केला.



Recent Comments