State

दावणगेरीत दिवंगत शामनूर शिवशंकरप्पा यांना भावपूर्ण श्रद्धांजली

Share

दावणगेरे येथील विद्यमान आमदार शामनूर शिवशंकरप्पा यांचे नुकतेच निधन झाले असून, त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी शुक्रवारी अनेकोंडा येथील कल्लेश्वर राईस मिल परिसरात ‘नुडीनमन’ (श्रद्धांजली) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी शामनूर शिवशंकरप्पा यांच्या जीवनप्रवासावर आधारित ‘अमृत पुरुष’ या माहितीपटाचे प्रकाशन करून त्यांना पुष्पंजली अर्पण केली.

या सोहळ्यात उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी शामनूर यांच्या स्मृतीप्रत्यर्थ २०२६ सालच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन केले. एआयसीसी अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी शामनूर शिवशंकरप्पा यांच्या पुतळ्याचे अनावरण केले. विशेष म्हणजे, अयोध्येतील श्रीराम मूर्तीचे शिल्पकार अरुण योगीराज यांनी हा पुतळा साकारला आहे. माजी पंतप्रधान एच.डी. देवेगौडा यांनी शामनूर यांच्या जीवनावर आधारित एका पुस्तिकेचे लोकार्पण करून आदरांजली वाहिली.

कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या विविध मठांच्या मठाधीशांनी यावेळी आशीर्वचन दिले. व्यासपीठावर शामनूर शिवशंकरप्पा यांचे कुटुंबीय उपस्थित होते. त्यांच्या नातवंडांनी आपल्या आजोबांच्या आठवणींना उजाळा देत जुने अनुभव सांगितले.

यावेळी शामनूर शिवशंकरप्पा यांचे पुत्र तथा मंत्री एस.एस. मल्लिकार्जुन यांनी वडिलांच्या कार्याचा गौरवपूर्ण उल्लेख केला. त्यांच्या समाजसेवेचा वारसा पुढे नेण्याचा संकल्प त्यांनी व्यक्त केला. या कार्यक्रमाला विविध मठांचे मठाधीश, दिग्गज राजकीय नेते आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: