Dharwad

धारवाडमध्ये ‘मार्क’ चित्रपटाचे जंगी स्वागत

Share

अभिनय चक्रवर्ती किच्चा सुदीप याची मुख्य भूमिका असलेला बहुप्रतिक्षित ‘मार्क’ चित्रपट आज प्रदर्शित झाला असून धारवाडमध्ये सुदीपच्या चाहत्यांनी या चित्रपटाचे अभूतपूर्व स्वागत केले आहे. लाडक्या अभिनेत्याला पडद्यावर पाहण्यासाठी पहाटेपासूनच चाहत्यांनी गर्दी केली होती.

धारवाडमधील प्रसिद्ध संगम चित्रपटगृहात ‘मार्क’ चित्रपटाचा खेळ सुरू झाला असून पहिलाच शो हाऊसफुल्ल झाला आहे. किच्चा सुदीपच्या चाहत्यांनी आपल्या लाडक्या अभिनेत्याच्या भव्य कटआऊटला दुग्धाभिषेक केला आणि सुदीपच्या समर्थनार्थ जोरदार घोषणाबाजी केली. तसेच चित्रपटगृहाबाहेर फटाके फोडून आणि गुलालाची उधळण करून ‘मार्क’चे स्वागत करण्यात आले. चित्रपटगृहाच्या आत डॉ. विष्णुवर्धन आणि सुदीप यांच्या प्रतिमा हातात घेऊन प्रेक्षकांनी चित्रपटाचा आनंद लुटला.

चित्रपटामध्ये सुदीपची एन्ट्री होताच चाहत्यांनी एकच जल्लोष केला आणि संपूर्ण थिएटर टाळ्यांच्या कडकडाटाने दुमदुमले. विद्यानगरी धारवाडमध्ये ‘मार्क’ चित्रपटाला मिळणारा प्रचंड प्रतिसाद पाहता हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर नवे विक्रम प्रस्थापित करेल अशी प्रतिक्रिया चाहत्यांनी व्यक्त केली आहे.

Tags: