मनरेगा योजनेतून महात्मा गांधींचे नाव हटवून केंद्र सरकारने आपला खुजेपणा प्रदर्शित केला आहे. हे कृत्य देशाला शोभा देणारे नसून, या क्षुल्लक कामासाठी पंतप्रधानांना देशाची माफी मागावी लागेल, असे रोखठोक प्रतिपादन कर्नाटकचे कायदा आणि संसदीय कामकाज मंत्री एच.के. पाटील यांनी केले.

बेंगळुरू येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना मंत्री एच.के. पाटील यांनी नरेगा योजनेच्या नाव बदलावरून केंद्र सरकारवर कडक शब्दांत टीका केली. ते म्हणाले, “महात्मा गांधींसारखा महान नेता संपूर्ण जगात दुसरा नाही. त्यांनी जगाला खऱ्या शांततेची आणि अहिंसेची शिकवण दिली. आज जगात जर कुठे शांती आणि बंधुत्वाचा संदेश पोहोचला असेल, तर तो केवळ गांधीजींमुळेच आहे.”
अशा जागतिक दर्जाच्या महान नेत्याचे नाव एका महत्त्वाच्या योजनेतून वगळणे हे केंद्र सरकारचे नीच राजकारण असल्याचे त्यांनी नमूद केले. “एका मोठ्या नेत्याचे नाव बदलून स्वतःला मोठे समजणे हा संकुचित विचार आहे. केंद्र सरकारने केलेले हे कृत्य अत्यंत खेदजनक असून, याबद्दल पंतप्रधानांना जनतेची माफी मागावी लागेल,” असेही पाटील यांनी या वेळी ठणकावून सांगितले.


Recent Comments