Ramdurg

अय्यप्पा स्वामींची माळ घालण्यास पालकांचा नकार; १४ वर्षीय मुलाची आत्महत्या

Share

अय्यप्पा स्वामींची माळ घालण्यास पालकांनी परवानगी न दिल्याने एका १४ वर्षीय मुलाने टोकाचे पाऊल उचलत आत्महत्या केली आहे. बेळगाव जिल्ह्यातील रामदुर्ग तालुक्यातील गडद केरी येथे ही हृदयद्रावक घटना घडली आहे.

मयत धरणेश याला अय्यप्पा स्वामींची दीक्षा घेऊन माळ परिधान करण्याची तीव्र इच्छा होती. त्याने आपली ही इच्छा कुटुंबीयांकडे बोलून दाखवली होती. मात्र, वय लहान असल्याने किंवा इतर काही कारणांमुळे पालकांनी त्याला माळ घालण्यास संमती दिली नाही. यामुळे अत्यंत व्यथित झालेल्या धरणेशने घरात कोणीही नसताना गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपविली.

धरणेशच्या मृत्यूची बातमी समजताच कुटुंबीयांनी एकच टाहो फोडला. माळ घालण्यास नकार दिल्याने तो इतका टोकाचा निर्णय घेईल, असे स्वप्नातही वाटले नव्हते, अशी भावना व्यक्त करत नातेवाईकांनी शोक अनावर केला आहे. या घटनेमुळे संपूर्ण गडद केरी गावावर शोककळा पसरली आहे.

याप्रकरणी रामदुर्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. छोट्या कारणावरून तरुण पिढी अशा प्रकारे टोकाचे निर्णय घेत असल्याने समाजात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

Tags: