Belagavi

बेळगावात दलित संघर्ष समितीकडून ‘मनुस्मृती दहन दिन’

Share

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी अस्पृश्यता, जातीयता आणि लिंगभेदाचे प्रतीक असलेल्या मनुस्मृतीचे दहन करून मानवधर्मासाठी पुकारलेल्या लढ्याला ९८ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त बेळगावात अभिवादन करण्यात आले.

दलित संघर्ष समितीच्या बेळगाव जिल्हा शाखेच्या वतीने बुधवारी या ऐतिहासिक दिवसाचे औचित्य साधून मनुस्मृतीच्या प्रतींचे दहन करण्यात आले. बेळगाव येथील डॉ. आंबेडकर उद्यानात बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून कार्यकर्त्यांनी समतेचा जागर केला.

२५ डिसेंबर १९२७ रोजी महाड येथे बाबासाहेबांनी विषमतेच्या संहितेचे दहन करून क्रांतीचे रणशिंग फुंकले होते. याच ऐतिहासिक घटनेची आठवण म्हणून बेळगावात दलित नेत्यांनी एकत्र येत मनुस्मृतीच्या प्रती जाळल्या.

“धर्म आणि जातीच्या नावावर मानवी शोषण करणाऱ्या व्यवस्थेविरुद्ध बाबासाहेबांनी १९२७ मध्ये महाड येथे मनुस्मृतीचे दहन केले होते. आजही अनेक ठिकाणी जातीयता शिल्लक असून ती नष्ट करण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याची गरज आहे,” असे प्रतिपादन महादेव तलवार यांनी केले.

अंधश्रद्धा आणि जातीयवादाचे समर्थन करणाऱ्या मनुस्मृतीचे बाबासाहेबांनी दहन केले होते, मात्र आजही समाजात अशा घटना घडत असल्याचे मत दलित नेते मल्लेश चौगुले यांनी व्यक्त केले. हुबळी येथील मान्या ऑनर किलिंग प्रकरणाचा निषेध नोंदवत, यातील नराधमांना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी त्यांनी या वेळी केली.

या प्रसंगी विविध दलित संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: