कर्नाटक प्रदर्शन प्राधिकरण आणि पर्यटन विभाग, कर्नाटक सरकार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या भव्य वस्तू प्रदर्शनला बेळगावकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे.


या उत्सवात सरकारी विभागांचे माहिती स्टॉल्स, भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या यल्लम्मा देवीच्या मंदिराची हुबेहूब प्रतिकृती आणि केएमएफ डेअरीचे मॉडेल नागरिकांचे विशेष आकर्षण ठरत आहेत. दररोज संध्याकाळी आयोजित केले जाणारे सांस्कृतिक कार्यक्रम प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत.

या प्रदर्शनाचे सर्वात मोठे आकर्षण म्हणजे ‘जलपरी’ हे पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होत आहे. बेळगावमध्ये पहिल्यांदाच अशा प्रकारचा उपक्रम राबवण्यात आल्यामुळे लोकांमध्ये मोठी उत्सुकता आहे. बंगळुरूहून आलेल्या निर्माला अशोक शिंदे यांनी या उपक्रमाचे कौतुक केले.

लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत सर्वांसाठी येथे मनोरंजनाची साधने उपलब्ध आहेत. फनफेअर, अम्युझमेंट पार्क, ड्रॅगन ट्रेन, टोरा-टोरा, जायंट व्हील यांसारख्या चित्तथरारक राईड्सचा आनंद नागरिक लुटत आहेत. याशिवाय विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल्स आणि खरेदीसाठी आकर्षक दुकानांनी या उत्सवाची शोभा वाढवली आहे.

म्हैसूर दसऱ्यात लोकप्रिय झालेले हे प्रदर्शन आता बेळगावात दाखल झाल्याने स्थानिकांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. “संपूर्ण प्रदर्शन फिरून पाहण्यासाठी किमान ३ तासांचा वेळ लागतो, आम्ही सहकुटुंब याचा आनंद घेत आहोत,” अशी भावना गणेश नावाच्या पर्यटकाने व्यक्त केली. खानापूर तालुक्यातील कक्केरी येथील अखिलेश सुतार आणि बेळगावचे मिलन अनगोळकर यांनीही जलपरीच्या खेळाचे विशेष कौतुक केले. हे भव्य प्रदर्शन पाहण्यासाठी नागरिक दररोज संध्याकाळी ४ ते रात्री १० या वेळेत बेळगावच्या क्लब रोडवरील सीपीएड मैदानावर भेट देऊ शकतात.



Recent Comments