कवलगुड्ड येथील श्री करियोग सिद्ध शिक्षण संस्थेच्या विकासासाठी लवकरच एक कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे आश्वासन आमदार यतींद्र सिद्धरामय्या यांनी दिले.

कवलगुड्ड येथील श्री करियोग सिद्ध कन्नड माध्यम प्राथमिक शाळा आणि श्री सिद्धरत्न माध्यमिक शाळेच्या १३ व्या वार्षिक स्नेहसंमेलन सोहळ्यात यतींद्र सिद्धरामय्या प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी त्यांनी शाळेची शैक्षणिक प्रगती पाहून समाधान व्यक्त केले. सीमाभागातील ग्रामीण विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी अशा संस्थांना बळ देणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
संस्थेचे संस्थापक सिद्धयोगी अमलेश्वर महाराज यांनी यावेळी संस्थेच्या वाटचालीचा आढावा घेतला. सीमावर्ती भागातील गरीब आणि अनाथ विद्यार्थ्यांना शिक्षणाची सोय व्हावी या उद्देशाने ही संस्था उभारली आहे. लोकसहभागातून सुरू असलेल्या या कार्यात यतींद्र सिद्धरामय्या यांनी निधी जाहीर केल्यामुळे मोठा आधार मिळाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
या सोहळ्यादरम्यान पत्रकारांनी राज्यातील नेतृत्व बदलाच्या चर्चेबाबत विचारले असता, यतींद्र सिद्धरामय्या यांनी या चर्चा फेटाळून लावल्या. मुख्यमंत्री सिद्धरामय्या आपला पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण करतील, हे यापूर्वीच स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे या विषयावर वारंवार प्रश्न विचारणे अनावश्यक असल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले.
या कार्यक्रमाला कन्नड सीमा प्रदेश विकास प्राधिकरणाचे अधिकारी सोमन गौडा बेविनमराद, बेळगाव शहर विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष लक्ष्मण चिंगळे, रोटरी क्लबचे अध्यक्ष गजानन मंगसुळी, अस्लम नलबंद यांसह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.


Recent Comments