शांती आणि सौहार्दाचे प्रतीक असलेला नाताळ सण बेळगाव शहर आणि परिसरात ख्रिस्ती बांधवांनी अत्यंत उत्साहात साजरा केला. शहरातील प्रमुख चर्चमध्ये जागतिक शांततेसाठी विशेष प्रार्थना सभेचे आयोजन करण्यात आले होते.


संपूर्ण बेळगाव जिल्ह्यात आज नाताळचा जल्लोष पाहायला मिळत आहे. काल मध्यरात्रीपासूनच शहरात सणाची लगबग सुरू झाली होती. शहरातील मेथोडिस्ट चर्च, फातिमा कॅथेड्रल, सेंट मेरी आणि सेंट अँथनी चर्चसह विविध भागांतील चर्चमध्ये सणाचा उत्साह ओसंडून वाहत होता. मध्यरात्री ठीक १२ वाजता येशू ख्रिस्ताच्या जन्माप्रीत्यर्थ केक कापून आणि प्रार्थना करून नागरिकांनी सणाचे स्वागत केले. यावेळी हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या भाविकांनी प्रभू येशूच्या चरणी नमन केले.
चर्चचा संपूर्ण परिसर आकर्षक रोषणाईने उजळून निघाला होता. ठिकठिकाणी ख्रिसमस ट्री, चांदण्या, सांताक्लॉज आणि भेटवस्तूंच्या सजावटीने भाविकांचे लक्ष वेधून घेतले. एकमेकांना नाताळच्या शुभेच्छा देत ख्रिस्ती बांधवांनी आनंद साजरा केला.
संपूर्ण जगाला प्रभू येशू ख्रिस्ताने सुख आणि शांती प्रदान करावी तसेच लोकांच्या समस्या दूर होऊन सर्वांमध्ये प्रेम आणि जिव्हाळा वाढावा अशी प्रार्थना रेव्हरंड सी. एस. हुलगिरी यांनी केली. समाजातील सर्व वाईट गोष्टी नष्ट होऊन मानवतेचा विजय व्हावा असेही त्यांनी आपल्या आशीर्वचनात म्हटले.
यावेळी मोठ्या संख्येने ख्रिस्ती बांधव आणि नागरिक उपस्थित होते.


Recent Comments