Belagavi

आराधना मतिमंद मुलांच्या शाळेत जागतिक दिव्यांग दिन साजरा

Share

बेळगावमधील किल्ला परिसरातील आराधना मतिमंद मुलांच्या शाळेत हिंदवाडी येथील क्रांती महिला मंडळ आणि उमा संगीत प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने जागतिक दिव्यांग दिन साजरा करण्यात आला.

‘विश्वास’ संस्थेचे संस्थापक आणि सचिव बसप्पा सुणधोळी यांनी रोपट्याला पाणी घालून कार्यक्रमाचे उद्घाटन केले. क्रांती महिला मंडळ आणि उमा संगीत प्रतिष्ठान दरवर्षी मतिमंद मुलांसोबत हा दिवस साजरा करतात, ही बाब अभिनंदनीय आहे. दिव्यांगांनी कोणावरही अवलंबून न राहता स्वावलंबी जीवन जगले पाहिजे. आज आमच्या संघटनेच्या चार सदस्यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळवले आहे, यावरून दिव्यांग व्यक्ती जिद्दीच्या जोरावर सामान्यांप्रमाणेच मोठी कामगिरी करू शकतात हे सिद्ध होते, असे त्यांनी म्हटले.

कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि आराधना मतिमंद शाळेचे मुख्याध्यापक गजानन सुतार यांनीही यावेळी आपले विचार मांडले. मतिमंद मुलांना जर विशेष प्रशिक्षण दिले, तर ते सामान्य मुलांपेक्षाही अधिक प्रगती करू शकतात. आमच्या शाळेतील मुलाने आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळवणे ही आमच्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे, असे त्यांनी आवर्जून सांगितले.

याच प्रसंगी समाजकार्यात आणि विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये बसप्पा सुणधोळी, ईरप्पा पंटगुंदी, लक्ष्मी रायण्णावर, ललिता गवास, रिया गोरल, सुषमा पंटगुंदी आणि राणी दुर्गाई यांचा सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षा मंगला मठद यांनी उपस्थितांचे स्वागत केले, तर सचिव भारती रत्नप्पगोळ यांनी प्रास्ताविक केले. अनिता जक्कन्नवर आणि रेणुका कांबळे यांनी प्रार्थना सादर केली. प्रायोजक पद्मा चौगुले आणि सपना चौगुले यांनी पाहुण्यांची ओळख करून दिली. प्रेमा उपाध्ये यांनी पुष्पसमर्पण केले. रत्न गुडगनट्टी यांनी आभार मानले आणि शोभा काडन्नवर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. या कार्यक्रमास डॉ. राजेंद्र मठद, गुडगनट्टी, नेरळेकर, विश्वास फाउंडेशनचे सदस्य, दोन्ही संस्थांचे पदाधिकारी, शालेय कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: