Belagavi

बेळगुंदी पोक्सो प्रकरणात राज्य सरकार गुन्हेगारांच्या पाठीशी : आमदार अभय पाटील

Share

बेळगुंदी येथील शिक्षकावरील पोक्सो प्रकरणात कोणतीही ठोस कारवाई न करणारे राज्य सरकार मृतावस्थेत असल्याची टीका दक्षिणचे आमदार अभय पाटील यांनी केली आहे. हे सरकार गुन्हेगारांच्या पाठीशी उभे राहत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

बेळगावात आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना आमदार अभय पाटील यांनी या प्रकरणावर तीव्र संताप व्यक्त केला. सरकार कोणतेही असो, लोकप्रतिनिधींवर कार्यकर्त्यांचा आणि मतदारांचा दबाव असतोच, परंतु अशा संवेदनशील प्रकरणांत आरोपींचे समर्थन करून समाजात कोणता संदेश दिला जात आहे, याचे आत्मचिंतन सरकारने करावे. हे सरकार सत्तेत आल्यापासून अशा घटनांमध्ये वाढ झाली आहे. पोलिसांनी कोणत्याही राजकीय दबावाला बळी पडू नये. गृहमंत्री सज्जन आहेत, मग ते या विषयावर गप्प का आहेत, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. तसेच दोषींना निलंबित करून सरकारने महिलांचा सन्मान राखावा, असे आवाहन त्यांनी केले.

या संपूर्ण प्रकरणात आर्थिक किंवा राजकीय शक्तीचा वापर होत असल्याचे स्पष्टपणे दिसून येत असल्याचे त्यांनी नमूद केले. पोलीस ठाण्यातील माहिती आणि एफआयआरमधील तपशील यात तफावत का आढळत आहे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. गृहमंत्र्यांनी या गंभीर विषयावर तातडीने भूमिका स्पष्ट करावी, अन्यथा खुर्चीच्या वादात अडकलेले हे सरकार केवळ नावापुरतेच उरले आहे आणि ते क्रिमिनल्सच्या पाठीशी उभे आहे, अशी टीका आमदार अभय पाटील यांनी केली.

Tags: