बेळगाव तालुक्यातील मच्छे नगर पंचायत व्याप्तीमधील मागासवर्गीय कल्याण विभागाच्या मॅट्रिकपूर्व मुलांच्या वसतिगृहास जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सदस्य सचिव तथा वरिष्ठ दिवाणी न्यायाधीश संदीप पाटील यांनी अचानक भेट देऊन पाहणी केली.


या भेटीदरम्यान त्यांनी वसतिगृहातील विविध विभागांची तपासणी करून उपलब्ध सोयीसुविधांचा आढावा घेतला. न्यायाधीश संदीप पाटील यांनी वसतिगृहातील स्वयंपाकघर, वर्गखोल्या, स्वच्छतागृह आणि ग्रंथालयाला भेट देऊन तेथील स्थितीची पाहणी केली. यावेळी त्यांनी वसतिगृहात राहणाऱ्या विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांना मिळणाऱ्या सोयीसुविधांबाबत सविस्तर माहिती जाणून घेतली.

पाहणीनंतर बोलताना त्यांनी वसतिगृह परिसर आणि स्वच्छतागृहांची नियमित स्वच्छता राखण्याच्या सूचना दिल्या. शासनाकडून मिळणाऱ्या सोयीसुविधांपासून कोणताही विद्यार्थी वंचित राहणार नाही, याची दक्षता घेण्याचे आदेश त्यांनी प्रशासनाला दिले.
विद्यार्थ्यांना ठरवून दिलेल्या वेळापत्रकानुसार सकस भोजन आणि नाश्ता पुरवण्यात यावा, अशा सूचना त्यांनी दिल्या. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळू नका, जर सोयीसुविधा पुरवण्यामध्ये कर्मचाऱ्यांनी हलगर्जीपणा केला तर त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा संदीप पाटील यांनी यावेळी कर्मचाऱ्यांना दिला.
या प्रसंगी वसतिगृहाचे प्राचार्य, वसतिगृह अधीक्षक चेतन आणि इतर कर्मचारी उपस्थित होते.


Recent Comments