Belagavi

‘रोटरी’ तर्फे ६५ लाभार्थ्यांना कृत्रिम हात-पायांचे मोफत वाटप

Share

रोटरी क्लब ऑफ वेणुग्राम, भारत विकास परिषद (पुणे), रोटरी क्लब ऑफ कात्रज (पुणे) आणि साक्ष मेडीटेक अँड पॅनेल लिमिटेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शिबिरात सुमारे ६५ लाभार्थ्यांना कृत्रिम हात आणि पायांचे यशस्वीरित्या रोपण करण्यात आले.

या शिबिराबाबत अधिक माहिती देताना रोटेरियन चंद्रकांत राजमाने यांनी सांगितले की, २ नोव्हेंबर रोजी आयोजित प्राथमिक शिबिरात ६५ लाभार्थ्यांच्या हात-पायांची मापे घेण्यात आली होती. त्यानंतर एका महिन्यात हे कृत्रिम अवयव तयार करून आज त्यांचे मोफत वाटप व जोडणी करण्यात आली. विशेष म्हणजे, या संपूर्ण प्रक्रियेत जपानमधील सात तज्ज्ञांच्या पथकाने विशेष तांत्रिक सहकार्य केले आहे.

याप्रसंगी बोलताना असिस्टंट गव्हर्नर राजेशकुमार तळेगावकर म्हणाले की, मागील शिबिरात मापे दिलेल्या लाभार्थ्यांना सुमारे ५० हजार रुपये किमतीचे कृत्रिम हात-पाय मोफत देण्यात आले आहेत. हे अवयव जुन्या पद्धतीसारखे जड नसून अत्यंत कमी वजनाचे आणि आधुनिक आहेत, ज्यामुळे लाभार्थ्यांना दैनंदिन कामे करणे सोपे होणार आहे.

या सेवाकार्यात लोकेश होंगल, मल्लिकार्जुन मुरगुडे, कृणाल बजाज, सोमनाथ कुडचीकर, महेश अनगोळकर यांच्यासह इतर सदस्यांनी परिश्रम घेतले आणि हे शिबिर यशस्वी केले. कृत्रिम अवयव मिळाल्याबद्दल सर्व लाभार्थ्यांनी रोटरी क्लब आणि संबंधित संस्थांचे आभार मानले.

Tags: