कर्नाटकातील काँग्रेस सरकार गेल्या अडीच वर्षांपासून पूर्णपणे भ्रष्टाचारात बुडालेले असून, आता जनतेचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य हिरावून घेण्याचे षडयंत्र रचत आहे, असा आरोप माजी आमदार संजय पाटील यांनी केला आहे.


राज्य सरकारने प्रस्तावित केलेल्या ‘द्वेषपूर्ण भाषण’ प्रतिबंधक विधेयकाचा निषेध करण्यासाठी आज बेळगावातील राणी चन्नम्मा चौकात भाजपतर्फे भव्य निदर्शने करण्यात आली.
यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना माजी आमदार संजय पाटील म्हणाले की, काँग्रेस सरकार केवळ घोटाळे आणि अंतर्गत वादात अडकले आहे. राज्यात महिलांवर अत्याचार होत आहेत, गुन्हेगारी वाढत आहे, पण सरकारला त्याचे काहीच सोयरसुतक नाही. संविधानाने दिलेल्या अधिकारांवर गदा आणण्यासाठी हे विधेयक आणले जात आहे. भाजप नेते आणि शेतकऱ्यांना जाणीवपूर्वक त्रास देण्यासाठी सत्तेचा हा गैरवापर सुरू असून, हे विधेयक सरकारने तात्काळ मागे घ्यावे, बेळगावचे अधिवेशन सुरू असताना एका अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराची घटना दाबण्याचा प्रयत्न सरकारने केला आहे. तसेच तहसीलदार कार्यालयातील आत्महत्येचे प्रकरणही मंत्र्यांनी दडपून टाकले. हे सरकार संविधानाची गळचेपी करत असून आम्ही याचा तीव्र निषेध करतो.
या आंदोलनात भारतीय जनता पक्षाचे बेळगाव उत्तर, दक्षिण आणि ग्रामीण मतदारसंघाचे सर्व पदाधिकारी, मंडळाचे अध्यक्ष आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. काँग्रेस सरकारच्या विरोधात यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.


Recent Comments