Belagavi

पॉक्सो प्रकरणात त्रुटी आढळल्यास दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई : सतीश जारकीहोळी

Share

पॉक्सो प्रकरणातील आरोपीच्या सुटकेबाबत राजकीय दबावाला बळी पडू नका, अशा सूचना मंत्री सतीश जारकीहोळी यांनी दिल्या आहेत. याविषयी पोलीस आयुक्तांशी चर्चा करून चौकशी केली जाईल आणि त्रुटी आढळल्यास दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले.

आज बेळगाव येथे माध्यमांशी बोलताना त्यांनी विविध विषयांवर सरकारची भूमिका स्पष्ट केली. महाराष्ट्राचे खासदार धैर्यशील माने यांनी बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांविरुद्ध केलेल्या तक्रारीवर बोलताना मंत्री म्हणाले की, आमच्या मते जिल्हाधिकाऱ्यांनी कोणतीही चूक केलेली नाही आणि नोटीस आल्यास आम्ही त्याला कायदेशीररीत्या सामोरे जाऊ, असे ते म्हणाले.

जामिनावर पॉक्सो आरोपीची सुटका झाल्याच्या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले की, पोलीस प्रशासनाने कोणत्याही दबावाखाली काम करू नये. या प्रक्रियेत कुठेही चूक झाली असल्यास संबंधित अधिकाऱ्यांना जबाबदार धरले जाईल, असा इशारा त्यांनी दिला.

बेळगाव शहरातील वाहतुकीची समस्या सोडवण्यासाठी २७५ कोटी रुपये खर्चाच्या उड्डाणपूल योजनेला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. कोणत्याही भूसंपादनाशिवाय दोन टप्प्यांत हा उड्डाणपूल उभारला जाणार असून, फेब्रुवारी अखेरीस याचे काम सुरू होईल,असे जारकीहोळींनी नमूद केले.

बेळगाव जिल्हा विभाजनाच्या मुद्द्यावर आमदारांमध्ये मतभेद असून यावर लवकरच बेंगळुरूमध्ये बैठक होणार आहे. मुख्यमंत्री सिद्धरामय्या सर्वांची मते जाणून घेऊन यावर अंतिम निर्णय घेतील,अशी माहिती जारकीहोळींनी दिली.

Tags: