हुबळी शहराच्या बाहेरील राष्ट्रीय महामार्गावर असलेल्या अदरगुंची गावाजवळ राजस्थान ढाब्याला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत ढाब्यासह बाजूची ट्रक डेकोरेशनची दुकाने जळून खाक झाली असून, शेजारीच पेट्रोल पंप असल्याने सुदैवाने मोठा अनर्थ टळला आहे.

अदरगुंची जवळील राजस्थान ढाब्यात प्रथम शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. वाऱ्यामुळे ही आग क्षणार्धात पसरली आणि ढाब्याच्या शेजारी असलेल्या ट्रक डेकोरेशनच्या साहित्याच्या दुकानांना आपल्या कवेत घेतले. आगीची तीव्रता एवढी होती की, अर्ध्या तासात दुकानांमधील सर्व साहित्य जळून खाक झाले. महामार्गावर आगीच्या ज्वाळा आणि धुराचे लोट पाहून प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.
आग लागल्याचे लक्षात येताच स्थानिक नागरिक आणि ढाब्यावरील कर्मचाऱ्यांनी तात्काळ अग्निशमन दलाला पाचारण केले. घटनेचे गांभीर्य ओळखून अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. सुमारे तासाभराच्या अथक प्रयत्नांनंतर जवानांना आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. ढाब्याच्या अगदी जवळच पेट्रोल पंप असल्याने मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता होती, मात्र अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे ही भीती टळली.
हुबळी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली आहे. प्राथमिक तपासणीनंतर आगीचे नेमके कारण आणि झालेल्या आर्थिक नुकसानीचा आकडा समोर येईल, असे पोलिसांकडून सांगण्यात आले आहे.


Recent Comments