Chikkodi

२७-२८ रोजी चिकोडीत ‘सतीश शुगर अवॉर्ड’चा महाअंतिम सोहळा

Share

येत्या २७ आणि २८ डिसेंबर रोजी चिकोडीमध्ये किवड मैदानावर ‘सतीश शुगर अवॉर्ड’चा महाअंतिम सोहळा रंगणार आहे. मंत्री सतीश जारकीहोळी आणि खासदार प्रियांका जारकीहोळी यांच्या संकल्पनेतून होणाऱ्या या कार्यक्रमाची माहिती बुडा अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे यांनी दिली.

चिकोडी, रायबाग, अथणी, कागवाड आणि निपाणी तालुक्यातील प्राथमिक, माध्यमिक शाळा व महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांसाठी या सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये गायन, लोकगीत, समूह नृत्य, लोकनृत्य आणि भाषण अशा विविध स्पर्धांचा समावेश असून प्राथमिक फेरीतून निवडक संघांची महाअंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली आहे.

या महाअंतिम सोहळ्यात विजेत्या ठरणाऱ्या प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाच्या संघांना रोख पारितोषिके देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या महनीय व्यक्तींचा विशेष सत्कारही यावेळी केला जाणार आहे. कार्यक्रमासाठी भव्य व्यासपीठ उभारण्यात आले असून सुमारे ८ हजार प्रेक्षक बसू शकतील अशी बैठक व्यवस्था करण्यात आली आहे.

या पत्रकार परिषदेला महावीर मोहिते, प्रभाकर कोरे, सुरेश घरबुडे, गजानन मंगसुळी, रामा माने यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. या उपक्रमामुळे सीमाभागातील शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून मोठ्या संख्येने रसिकांनी या सोहळ्याला उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Tags: