Belagavi

राज्य सरकारचे आर्थिक नियोजन कोलमडले; खासदार जगदीश शेट्टर

Share

राज्य सरकारला सध्या आर्थिक परिस्थिती हाताळणे कठीण झाले असून, गॅरंटी योजनांच्या ओझ्याखाली प्रशासन दबले आहे. गृहलक्ष्मी योजनेचे पैसे देण्यासाठी सरकारकडे निधी नसल्यानेच लोकांची दिशाभूल केली जात आहे, अशी टीका माजी मुख्यमंत्री आणि खासदार जगदीश शेट्टर यांनी केली.

सोमवारी बेळगाव येथील शासकीय विश्रामगृहात त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.गृहलक्ष्मी योजनेचे पैसे थकल्याच्या मुद्द्यावरून शेट्टर यांनी महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्यावर निशाणा साधला. “फेब्रुवारी-मार्चचे हप्ते सोडून पुढच्या महिन्याचे पैसे देता येत नाहीत. दोन महिने सोडून पैसे देऊ असे म्हणणे चुकीचे आहे. लक्ष्मी हेब्बाळकर यांना नेमका हिशोबच कळत नाहीये,” असा टोला त्यांनी लगावला. या योजनेबाबत सरकारने तातडीने ‘श्वेतपत्रिका’ काढून आतापर्यंत किती हप्ते आणि किती निधी दिला, याची स्पष्ट माहिती द्यावी, असे आव्हानही त्यांनी दिले. मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि डी.के. शिवकुमार यांनी या विषयात हस्तक्षेप करून गोंधळ दूर करावा, असेही ते म्हणाले.

काँग्रेसमधील नेतृत्व बदलाच्या चर्चेवर बोलताना शेट्टर म्हणाले की, मल्लिकार्जुन खर्गे यांनी “तुमचे प्रश्न तुम्हीच सोडवा” असे म्हणून पक्षात समस्या असल्याचे मान्य केले आहे. एकीकडे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पक्षात सर्व काही आलबेल असल्याचे सांगतात, मग खर्गे यांना मध्यस्थीची गरज का पडली? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. “मीच पाच वर्षे मुख्यमंत्री राहणार” असे सिद्धरामय्या ठामपणे का सांगत नाहीत? याचाच अर्थ दोघांमध्ये हायकमांडच्या उपस्थितीत काहीतरी गुप्त करार झाला आहे, असा दावाही शेट्टर यांनी केला.

सत्तासंघर्ष आणि गॅरंटी योजनांच्या आर्थिक नियोजनाअभावी राज्यातील विकासकामे पूर्णपणे कुंठित झाली आहेत. जनतेला अंधारात ठेवण्याचे काम थांबवून सरकारने राज्याचा कारभार रुळावर आणावा, अशी मागणी जगदीश शेट्टर यांनी यावेळी केली.

Tags: