Belagavi

खासदार धैर्यशील माने यांच्या विरोधात करवेचा (शिवरामगौडा गट) गोंधळ

Share

बेळगाव जिल्हाधिकाऱ्यांनी हक्कभंग केल्याची तक्रार लोकसभा अध्यक्षांकडे करणाऱ्या खासदार धैर्यशील माने यांच्या विरोधात आज बेळगावात कर्नाटक रक्षण वेदिकेच्या (शिवरामेगौडा गट) वतीने तीव्र निदर्शनं करण्यात आली.

यावेळी कार्यकर्त्यांनी खासदार माने यांची अणकुचीदार अंत्ययात्रा काढून आपला संताप व्यक्त केला. खासदार धैर्यशील माने यांनी जिल्हाधिकाऱ्यांविरुद्ध तक्रार दाखल केल्याच्या निषेधार्थ काढलेल्या या अंत्ययात्रेमुळे राणी चन्नम्मा चौकात काही काळ तणावाचे आणि गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांची जबाबदारी चोख पार पाडली असतानाही त्यांच्यावर दबाव आणला जात असल्याचा आरोप कन्नड कार्यकर्त्यांनी केला.

यावेळी बोलताना कर्नाटक रक्षण वेदिकेचे जिल्हाध्यक्ष वाजिद हिरेकुडी यांनी महाराष्ट्र एकीकरण समिती आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना बेळगावातून हद्दपार करण्याची मागणी केली. जिल्हाधिकाऱ्यांनी घेतलेली भूमिका योग्यच असून आम्ही त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत, असे स्पष्ट करत जिल्हाधिकाऱ्यांचा सत्कार करणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

या आंदोलनात कर्नाटक रक्षण वेदिकेचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Tags: