मूग खरेदीसाठी सरकारने लादलेले निकष तातडीने रद्द करावेत आणि शेतकऱ्यांनी पिकवलेला सर्व मूग खरेदी करावा, या मागणीसाठी कुंदगोळ तालुक्यातील हिरेगुंजळ गावातील शेतकऱ्यांनी धारवाड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उग्र निदर्शनं केली.

निसर्गाच्या लहरीपणामुळे यंदा शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अतिवृष्टी आणि सततच्या पावसामुळे मूग पिकाचा दर्जा घसरला असून दाणे खराब झाले आहेत. मात्र, सरकार केवळ दर्जेदार मुगाचीच खरेदी करत असून त्यासाठी ‘एफएक्यू’ निकष लावले आहेत. खराब झालेल्या मालाला कमी दर देऊन का होईना, पण सरकारने तो खरेदी करावा, अशी मागणी अन्नदात्याने केली आहे.
हवामानातील बदलांमुळे पीक खराब झाले असेल तर त्यात शेतकऱ्याचा काय दोष, असा सवाल आंदोलकांनी उपस्थित केला आहे. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मध्यम प्रतीचा मूग ओतत शेतकऱ्यांनी आपला आक्रोश व्यक्त केला. खराब झालेला माल सरकारने खरेदी न केल्यास शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होणार असून त्यांच्यासमोर जगायचे कसे, असा प्रश्न उभा राहिला आहे.
हवामानामुळे पीक हातातून गेले असताना सरकारने मदतीचा हात देणे अपेक्षित आहे. त्यामुळे सरकारने तातडीने खरेदीचे निकष शिथिल करावेत आणि उत्पादित झालेला सर्व मूग खरेदी केंद्रांमार्फत विकत घ्यावा, असा आग्रह शेतकऱ्यांनी धरला आहे. अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.


Recent Comments