Dharwad

विद्यगिरी पोलीस ठाण्याच्या निरीक्षकांकडून मंदिराला नवीन कळस भेट

Share

धारवाडमध्ये एका पोलीस निरीक्षकाने मंदिराचा चोरीला गेलेला कळस शोधण्यासोबतच, पोलीस कर्मचाऱ्यांच्या मदतीने मंदिराला नवीन कळस भेट देऊन एक नवा आदर्श निर्माण केला आहे.

धारवाडच्या विद्यगिरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील महागणपती मंदिरात २५ ऑक्टोबर रोजी कळस चोरीला गेला होता. याप्रकरणी मंदिर व्यवस्थापन समितीने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. या प्रकरणाचा तपास करत असताना चोरटे सापडले नाहीत, मात्र देवाचा अपमान होऊ नये आणि मंदिराचे पावित्र्य जपले जावे या उद्देशाने निरीक्षक मोहम्मद रफीक तहसीलदार यांनी पुढाकार घेतला. त्यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने मंदिराला नवीन कळस देऊन एक सामाजिक आदर्श घालून दिला आहे.

धर्माच्या नावावर समाजात तेढ निर्माण होत असताना, पोलीस निरीक्षकांनी केलेल्या या कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. निरीक्षक मोहम्मद रफीक यांनी पोलीस कर्मचाऱ्यांच्या सहकार्याने हा नवीन कळस मंदिर समितीकडे सुपूर्द केला.

मंदिराचा कळस चोरीला गेल्याने भाविकांच्या भावना दुखावल्या होत्या, त्यामुळे आम्ही हा मदतीचा हात दिला असल्याचे त्यांनी म्हटले.

पोलीस प्रशासनाच्या या संवेदनशील निर्णयामुळे समाजात सकारात्मक संदेश गेला असल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.

विद्यगिरी पोलिसांच्या या माणुसकीच्या दर्शनामुळे पोलीस दलाची प्रतिमा उंचावली असून, पोलीस आणि नागरिक यांच्यातील विश्वासाचे नाते अधिक घट्ट झाले आहे.

Tags: