वैद्यकीय नियुक्ती पत्र प्रदान करण्याच्या कार्यक्रमात बिहारच्या मुख्यमंत्र्यांनी एका मुस्लिम महिला डॉक्टरचा हिजाब ओढल्याच्या घटनेचे तीव्र पडसाद धारवाडमध्ये उमटले आहेत. या घटनेचा निषेध करण्यासाठी धारवाडमधील मुस्लिम समुदायाने रस्त्यावर उतरून आपला संताप व्यक्त केला.

धारवाड जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उत्तर कर्नाटक संघर्ष व्यासपीठ आणि एपीसीआर फॉरवर्ड ट्रस्टच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. बिहारची राजधानी पाटणा येथे आयुष डॉक्टरांना नियुक्ती पत्र वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात एक मुस्लिम महिला डॉक्टर हिजाब परिधान करून आली होती. यावेळी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी हिजाब ओढून त्यानंतर तिला प्रमाणपत्र दिले. या घटनेचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला असून, त्याद्वारे मुख्यमंत्र्यांनी धार्मिक पेहरावाचा अवमान केल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे.
एका सार्वजनिक कार्यक्रमात महिला डॉक्टरचा अशा प्रकारे अपमान करणे निंदनीय असून, नितीश कुमार यांनी तातडीने आपल्या मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी यावेळी आंदोलकांनी केली.


Recent Comments