Belagavi

बेळगावमध्ये मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांच्या हस्ते नवीन कृषी योजनेचा शुभारंभ

Share

शेतकरी, कृषी विभाग आणि साखर आयुक्तालय यांच्यात समन्वय असल्यास नवीन योजना आणि आधुनिक यंत्रसामग्रीची माहिती शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणे सोपे होते. आमचे सरकार पूर्णपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आज बेळगावमध्ये केले.

बेळगाव तालुक्यातील हुदली गावात साखर कारखान्यांच्या सहयोगाने राबवण्यात येणाऱ्या नवीन योजनेचा आज प्रारंभ झाला. यामध्ये एकात्मिक मृद आणि जल व्यवस्थापन, कचरा व्यवस्थापन, पाण्याचा कार्यक्षम वापर आणि संतुलित पोषण व्यवस्थापन यांसारख्या महत्त्वाच्या प्रकल्पांचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी बोलताना मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले की, आपला देश हा कृषिप्रधान असून ६० टक्क्यांहून अधिक लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी आमचे सरकार आवश्यक ती सर्व मदत करण्यास तयार आहे. जमिनीचे आरोग्य आणि पाण्याचे नियोजन यावर सरकारने भर दिला आहे. रासायनिक खतांमुळे जमिनीचा पोत खालावतो, तो रोखण्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे. तसेच शेतीसाठी पाण्याचा अतिवापर टाळला पाहिजे, म्हणूनच आमचे सरकार ठिबक सिंचन योजनेला मोठ्या प्रमाणावर प्रोत्साहन देत आहे, असे त्यांनी म्हटले.

बेळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी यावेळी परदेशातील शेतीचा दाखला दिला. इतर देशांमध्ये कमी जमीन आणि कमी पाण्यात दोन ते तीन पट अधिक उत्पन्न घेतले जाते. त्याच धर्तीवर आपणही आधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करून उत्पादन वाढवले पाहिजे. शेतकऱ्यांना सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सरकार कार्यरत असून काळानुसार बदलणे ही काळाची गरज आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.

या सोहळ्याला महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, कृषी मंत्री चेलुवरायस्वामी, मुख्य प्रतोद अशोक पट्टण, ‘बुडा’चे अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे, जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन, जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.

Tags: