Hukkeri

हुक्केरी गटशिक्षणाधिकाऱ्यांविरुद्ध मुख्याध्यापिकेचे गंभीर आरोप

Share

बेळगाव जिल्ह्यातील हुक्केरी तालुक्यातील हरगापूर येथील सरकारी प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिकेने आपल्या निलंबनाविरुद्ध तीव्र संताप व्यक्त केला आहे.

शालेय सुधारणा आणि व्यवस्थापन समितीच्या कायद्याच्या चौकटीत राहूनच आपण काम केले आहे, तरीही गटशिक्षणाधिकाऱ्यांनी विनाकारण निलंबित केल्याचा आरोप करत मुख्याध्यापिकेने सोशल मीडियावर एक व्हिडिओ प्रसिद्ध केला आहे.

हुक्केरीच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांनी अधिकारांचा गैरवापर करून आपल्याला निलंबित केल्याची मुख्य तक्रार मुख्याध्यापिका सुरेखा बायन्नवर यांनी केली आहे. ‘एसडीएमसी’ समितीची काही नियमबाह्य कामे करण्यास मी विरोध दर्शविला होता. मात्र, याच गोष्टीचा राग मनात धरून गटशिक्षणाधिकाऱ्यांनी निलंबनाची कारवाई केली. शिक्षणमंत्री मधू बंगारप्पा यांनी या प्रकरणात तातडीने हस्तक्षेप करून आपल्याला न्याय मिळवून द्यावा, अशी विनंती त्यांनी डोळ्यांत पाणी आणून केली आहे. सध्या हा व्हिडिओ जिल्हाभरात चर्चेचा विषय ठरला आहे.

मी नेहमीच नियमांचे पालन करून शालेय हितासाठी काम केले आहे, तरीही माझ्यावर अन्याय झाला असे त्यांनी म्हटले. एक प्रामाणिक शिक्षिका असूनही मला अशा पद्धतीने त्रास दिला जात आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.

हुक्केरी तालुक्यातील हरगापूर येथील या मुख्याध्यापिकेने आपल्यावर झालेल्या अन्यायाचा पाढा वाचल्याने शिक्षण विभागात मोठी खळबळ उडाली आहे. आता या प्रकरणी शिक्षणमंत्री काय भूमिका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Tags: