Belagavi

गृहमंत्री आणि मुख्यमंत्र्यांकडून दिव्यांग दांपत्याची निराशा

Share

बेळगाव जिल्ह्यातील रायबाग तालुक्यातील हारूगेरी येथील एका दिव्यांग दांपत्याला प्लॉट देण्याच्या नावाखाली फसवण्यात आले आहे. न्यायाच्या आशेने हे दांपत्य आज मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी आले होते, मात्र मुख्यमंत्र्यांकडून कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने त्यांना रिकाम्या हाती परतावे लागले.

सन २०२३ मध्ये प्लॉट देण्याचे आमिष दाखवून बाळव्वा यल्लप्पा नाईक या दिव्यांग दांपत्याकडून जगदीश मुतनाळ, सत्यप्पा बडशेट्टी आणि करेप्पा होसपेटी नावाच्या व्यक्तींनी साडेसहा लाख रुपये उकळले होते. मात्र, गेल्या तीन वर्षांपासून त्यांना प्लॉटही देण्यात आला नाही आणि पैसेही परत केले नाहीत. याउलट त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली जात आहे. याप्रकरणी तक्रार देण्यासाठी गेल्यावर हारूगेरी पोलिसांनी तक्रार घेण्याऐवजी आम्हालाच धमकावून हाकलून दिले, असा गंभीर आरोप या दांपत्याने केला आहे. न्यायासाठी गृहमंत्र्यांकडे धाव घेतल्यानंतर आता हे दांपत्य मुख्यमंत्र्यांच्या दारी आले होते, मात्र तिथेही त्यांच्या पदरी निराशाच पडली.

आम्ही दोघेही पती-पत्नी दिव्यांग असून शारीरिक असमर्थतेमुळे आमचे जीवन अत्यंत खडतर बनले आहे. काही दिवसांपूर्वी गृहमंत्र्यांना निवेदन दिले होते, मात्र त्यांनी केवळ आश्वासन दिले. आज मुख्यमंत्र्यांना भेटायला आलो तर त्यांनी साधे आमच्याकडे पाहिले सुद्धा नाही. मुख्यमंत्र्यांनीच न्याय दिला नाही, तर आम्ही आता कुठे जाऊन मरायचे असा सवाल बाळव्वा यल्लप्पा नाईक यांनी उपस्थित केला. असे त्यांनी म्हटले.

एकीकडे सरकार सर्वसामान्यांच्या हिताच्या गप्पा मारत असताना, दुसरीकडे बेळगावच्या या हतबल दिव्यांग दांपत्याला मुख्यमंत्र्यांची भेट न मिळणे, हे संतापजनक असल्याचे बोलले जात आहे.

Tags: